*उमेदवारी अर्ज दाखल करतांना महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन* *पाचोरा-भडगावातील हजारो समर्थकांची उपस्थिती* - MHL News

Breaking

Thursday, 25 April 2024

*उमेदवारी अर्ज दाखल करतांना महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन* *पाचोरा-भडगावातील हजारो समर्थकांची उपस्थिती*

 


महा.लोकसंवाद न्यूज 

*जळगाव, दिनांक २५ एप्रिल (जिल्हा प्रतिनिधी )* : लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण पाटील यांनी उमेदवारी दाखल केली असून याप्रसंगी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे हजारो समर्थक वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले.


बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे जळगावातील उमेदवार करण बाळासाहेब पाटील आणि रावेरातील उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याप्रसंगी मविआच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो समर्थकांची उपस्थिती लाभली.


उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जळगावात आले. प्रारंभी वैशालीताई सुर्यवंशी यांनी जळगावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मान्यवरांशी चर्चा केली. यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून महाविकास आघाडीची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय राऊत, आ. जितेंद्र आव्हाड आदी मान्यवरांनी सत्ताधार्‍यांवर कडाडून प्रहार केले. याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.


दरम्यान, महाविकास आघाडीच्या या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळली असल्याचे दिसून येत आहे. तर वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लक्षणीय बाब म्हणजे नागरिक देखील मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment