महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी वरणगाव ता.भुसावळ
दिनाक 10:–आचेगाव ता.भुसावळ येथे शेतकऱ्यांचे शेतातील साहित्य चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करत नागरिकांनी लेखी तक्रार सादर केली आहे. दि.10 रोजी ही तक्रार देण्यात आली असून राजु बेंडाळे,राजेंद्र पाटील,दिपक बेंडाळे आणि अक्षय बेंडाळे यांनी संयुक्तरित्या अर्जावर स्वाक्षरी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार,अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेत परिसरात प्रवेश करून शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार,स्टार्टर, केबल कटआऊट तसेच इतर महत्त्वाचे साहित्य चोरुन नेले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून शेतीच्या कामांवरही परिणाम झाला आहे
विशेषतःपाणीपुरवठा आणि सिंचन व्यवस्था विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तक्रारदारांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान,वरणगाव पोलीस स्टेशनकडून तक्रारीची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील नागरिकांनी देखील पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून चोरीच्या घटनांना आळा घालावा,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment