महा.लोकसंवाद न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/जळगाव
बोदवड तालुक्यातील येवती येथे किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांनी एका शेतमजुरास मारहाण करून लोखंडी रॉडने गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गजानन सुकदेव बावस्कर (वय ४०, रा. येवती ता. बोदवड जि. जळगाव) हे पत्नी व तीन मुलींसह राहून शेती मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दिनांक २८ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कुटुंबाचे जेवण आटोपल्यानंतर त्यांची लहान मुलगी देवयानी ही भांडी घासत होती. त्यावेळी गजानन बावस्कर यांनी मुलीला “भांडी नंतर घास, शेजारी माणसे बसलेली आहेत” असे सांगितले.
याचाच राग आल्याने शेजारी राहणारे पिंताबर अरुण बावस्कर यांनी शिवीगाळ करून “तुला मारून टाकतो” अशी धमकी दिली. त्यानंतर पिंताबर बावस्कर व त्यांचे वडील अरुण गिरधर बावस्कर यांनी गजानन बावस्कर यांना खाली पाडून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अरुण बावस्कर यांनी हातातील लोखंडी रॉडने नाकावर वार केल्याने त्यांच्या छाती, डोके व नाकाला दुखापत झाली.
घटनेनंतर गजानन बावस्कर यांची पत्नी रेखा बावस्कर, दिर सतीष बावस्कर व गावातील काही नागरिकांनी त्यांना बोदवड पोलीस स्टेशन येथे आणले. पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे उपचारासाठी रवाना केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अयुब तडवी करीत आहेत.

No comments:
Post a Comment